ग्रोमर वेंचर्सची बेफाम गुंडागिरी, प्रशासनाचा बेजबाबदारपणा नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत!
कन्हान : - कन्हान-पिपरी नगर परिषद हद्दीत सुरू असलेल्या अतिक्रमण निर्मूलन प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे . ग्रोमर वेंचर्सच्या लोकांनी प्रशासनाचा आणि कायद्याचा उघडउघड अपमान करत , दुकानदारांना धमकावून त्यांच्या हक्काच्या जागांवर पुन्हा कब्जा करण्यासाठी गुंडागिरीचा कळस गाठला आहे . राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल आणि खासदार श्यामकुमार बर्वे यांच्या आदेशांची पायमल्ली करत प्रशासनाने पुन्हा एकदा बेजबाबदारपणाचे प्रदर्शन केले आहे .
ग्रोमर वेंचर्सचे प्लॉट मालक आणि त्यांच्या साथीदारांनी प्रशासनाच्या निर्णयाला धुडकावून लावत त्यांच्या जागांवर माती आणि गिट्टी टाकून दुकानदारांना जागा मिळू नये यासाठी शिताफीने खेळी केली . राज्यमंत्री आणि खासदार यांनी दिलेल्या स्पष्ट तोंडी आदेशा नंतर ही प्रशासनाची कृती अतिशय हलगर्जीपणाची ठरली आहे . मुख्याधिकारी दीपक घोडके यांनी जागा मोकळी करण्याचे प्रयत्न सुरू केले असता , या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी प्रशासनाला धमकावून त्यांचे काम रोखण्याचा प्रयत्न केला .
नप प्रशासनाने दुकानदारांना त्यांच्या मूळ जागेवर पुनर्वसन करण्याचा कोणताही ठोस उपाय न करता केवळ कागदी कारवाई करण्यात वेळ घालवला आहे . यामुळेच ग्रोमर वेंचर्सच्या लोकांना बिनधास्तपणे गुंडगिरी करण्याचे धाडस मिळाले आहे . दुकानदारांच्या जागांवर पुन्हा रात्रीच्या अंधारात माती आणि गिट्टी टाकून बेकायदेशीर कब्जा करण्याचा प्रयत्न झाला , ज्यावर प्रशासनाने केवळ निष्क्रीय बघ्याची भूमिका घेतली आहे .
अतिक्रमण कारवाईतून बेघर झालेल्या दुकानदारांचे आधीच कंबरडे मोडले आहे . त्यातच आता ग्रोमर वेंचर्सच्या या गुंड प्रवृत्तीने त्यांचे पुनर्वसनही रोखले आहे . या प्रकारामुळे दुकानदारांवर बेरोजगारीचे संकट कोसळले असून , त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह मोठ्या संकटात सापडला आहे .
ग्रोमर वेंचर्सच्या गुंडांनी शासकीय कामात अडथळा आणणे , प्रशासनाला धमकावणे , आणि पुन्हा जागा अडवणे यासारखे गुन्हे उघडपणे केले आहेत . यामुळे कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे . पोलीस आणि नप प्रशासन दोन्ही या प्रकरणात नाकर्तेपणाची भूमिका बजावत असल्याने नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे .
या प्रकरणामुळे कन्हान शहरात गुन्हेगारीचे जाळे वाढण्याची भीती व्यक्त होत आहे . बाहेरून आलेल्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी शहरात अराजकतेचे वातावरण निर्माण केले आहे . शासनाने वेळेवर योग्य ती कारवाई केली नाही , तर भविष्यात या गुंडगिरीचे प्रमाण अधिकच वाढण्याचा धोका आहे.
राज्यमंत्री आशिष जयस्वाल आणि खासदार श्यामकुमार बर्वे यांनी 23 किंवा 24 जानेवारीला नगर परिषद कार्यालयात यासंदर्भात बैठक आयोजित केली आहे . त्यांनी दुकानदारांच्या समस्या सोडवून त्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले आहे . मात्र, प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि नप मुख्याधिकाऱ्यांची भूमिका या चर्चेच्या यशावर संशय निर्माण करत आहे .
माजी खासदार प्रकाश जाधव यांनी ही 27 जानेवारी पर्यंत दुकानदारांचे पुनर्वसन झाले नाही , तर तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे . स्थानिक नागरिक आणि दुकानदारही या अन्यायाविरुद्ध आक्रमक झाले असून , शासनाने योग्य पावले उचलली नाहीत तर कन्हानमध्ये मोठा संघर्ष उभा राहू शकतो .
प्रशासनाने गुंड प्रवृत्तीच्या लोकांविरोधात कठोर कारवाई करून कायदा-सुव्यवस्थेचा धाक निर्माण केला पाहिजे . अन्यथा, नागरिकांचा प्रशासनावरचा विश्वास उडेल आणि कन्हान शहर गुंडगिरीच्या आगीत होरपळले जाईल .
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर
0 टिप्पण्या
thank you for, you give me your most important time